जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । नोकरानेच सुमारे ५० लाखांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता. अखेर त्या नोकराला आरपीएफ पथकाने जेरबंद केलं आहे. राहुल रोशन कामत (वय २५, मर्णेया, उमरकट, जि. मधुबनी, बिहार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत हा कामाला होता. राहुलने १९ ऑगस्टला दुपारी घरात कुणीही नसतांना सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व विदेशी चलन असे मिळून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल लंपास करून सूरत गाठले. तेथून तो अंत्योदय एक्सप्रेसने बिहारमधील आपल्या गावाकडे निघाला होता. दरम्यान, नोकराने घरात हात चोरी केल्यानंतर गांधी यांनी खारघर पोलिसांत तक्रार दिली होती. स्थानिक पोलिसांनी याची माहिती लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिल्यामुळे ते या नोकराच्या मागावर होते. यातून तो अंत्योदय एक्सप्रेसने गावी जात असल्याचे तपासात दिसून आले.
भुसावळ येथील लोहमार्ग व आरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने २२५६४ अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यावर कसून चौकशी करतांना जनरल डब्यातून प्रवास करणार्या राहूल कामत याला ताब्यात घेण्यात आले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून ४३ लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत आरपीएफ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्ले यांच्या पथकाने केली.