---Advertisement---
जळगाव जिल्हा विशेष

खेड्यांमधील ३ ते ६ वर्षांच्या चिमुकल्यांशी खेळ; वाचा काय आहे हा प्रकार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२३ । ग्रामीण भागातील विशेषत: लहान खेड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेश: अंगणवाड्यांमधून होतो. अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणामधील निवारा असा आहे. ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबीं कडे लक्ष पुरवणे आदी कामे अंगणवाडीच्या माध्यमातून केली जातात. या शिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य या विषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मुलभूत कार्य आहे. मात्र ग्रामीण भागातील माता-बालकांना याचा योग्य लाभ मिळत नाही, याचं कारण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४५० अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीच नाही. यामुळे अनेक अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना भर थंडीतही शाळेच्या आवारात, ग्रामपंचायत कार्यालयात किंवा अन्य पर्यायी जागांमध्ये बसावे लागत आहे.

thambnail 1 jpg webp webp

जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात तीन हजार ४३८, तर जिल्हा परिषदेअंतर्गत शहरी भागात २०३ अशी एकूण तीन हजार ६४१ अंगणवाडी केंद्रे आहेत. ज्यातील ३५ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरत आहेत. तर जवळपास ४५० अंगणवाड्यांना इमारती नसल्याने या सर्व अंगणवाड्या शाळेच्या आवारात किंवा अन्य ठिकाणी ठिकाणी भरवल्या जात आहेत. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्या ३ हजार २४२ आहेत. जिल्हाभरात एकूण नव्याने २८९ अंगणवाड्यांच्या बांधकामांना मंजूरी मिळाली आहे. त्यापैकी २६३ अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

---Advertisement---

अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या धोरणांतर्गत अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेसाठी इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम, दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी कधी व कशी होणार हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाने या विषयाकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून लक्ष न देता चिमुकल्यांच्या भविष्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण या चिमुकल्यांवर भर थंडीत बाहेर कुडकुडीत बसण्याची वेळ आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---