जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । जळगाव तालुक्यातील विटनेर ते पळासखेडा मिराचे दरम्यान तरूणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. साहिल विष्णू आराख (वय २४, रा. रा. खुबचंद साहित्या अपार्टमेंट) असे मृत तरुणाचे नाव आहे तर संदेश अशोक आराख (वय २२, रा.समतानगर, जळगाव) हा जखमी झाला आहे.
याबाबत असे कि, साहिल आराख हा औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे महाविद्यालयाच्या कामासाठी त्याचा चुलत भाऊ संदेश आराख याच्या सोबत दुचाकी क्रमांक (एम.एच २८ ५७५३) ने जात होते. यादरम्यान पळासखेडा मिराचेजवळ शिवढाबा या हॉटेलसमोर दुचाकीस्वार साहिल याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले. यात गाडी पूलाखाली कोसळण्यापूर्वी दुचाकीस्वार साहिल व मागे बसलेला संदेश या दोघांनी दुचाकीवरुन उडी मारली.
गाडी पूलाखाली कोसळली तर उडी मारल्यानंतर रस्त्यावरील दगडावर डोके आपटल्याने गंभीर दुखापत होवून साहिल जागीच ठार झाला तर संदेश जखमी झाला आहे. साहिल यास जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांची जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला होता. दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.