जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील तरुणासह तीन जणांचा किम सुरत येथे दीड दिवसाचा गणपती विसर्जन करताना पाटचारित बुडून मृत्यू झाला आहे. समाधान बापू ठाकरे (वय २६) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत असे की, बाभळेनाग येथील मूळ रहिवासी व हल्ली सुरत जिल्ह्यातील अाेलपाडा तालुक्यामधील किम येथे राहणारा समाधान ठाकरे सह त्यांचे दोन मावसभाऊ हे ११ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी किम येथील पाटाच्या पाण्याच्या चारीत गेलेले हाेते. या वेळी समाधान यांचा एक दहा वर्ष व एक बारा वर्षाचा मावसभाऊ हे पाय घसरून पाण्यात बुडत हाेते. हे पाहून समाधान ठाकरे यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाटचारीत उडी मारली. मात्र, यात समाधानचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली अाहे.
समाधान याचा मृतदेह मिळाला असून त्यांच्या दाेन्ही मावसभावांचे मृतदेह अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. ते शोधण्याचे काम किम येथील पथक करत आहे. या तीन जणांच्या अचानक मृत्यूमुळे पारोळा शहरातील कॅप्टन नगरमधील रहिवासी व मृताचे काका किशोर रामभाऊ ठाकरे व आजोबा रामभाऊ ठाकरे यांना जबर धक्का बसला अाहे.