⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | गुन्हे | वर्षभरापूर्वी चारचाकी घ्यायला आला अन् दरोड्याचा डोक्यात प्लॅन रचला!

वर्षभरापूर्वी चारचाकी घ्यायला आला अन् दरोड्याचा डोक्यात प्लॅन रचला!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोडा टाकणारी विदगावची टोळी एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । जिल्ह्यातील प्रसिद्ध वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करण्यात जळगाव एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. विदगाव येथील तरुणांच्या टोळीतील मुख्य म्होरक्याने वर्षभरापूर्वी कार पाहायला शोरुमला आल्यावर त्याने दरोड्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव हे परिवारासह रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात राहतात. बच्छाव सर लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेलेले होते. दि.१४ नोव्हेंबर रोजी मोठा मुलगा किरण बच्छाव त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला.

नोकर बाहेर पडताच ७ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता बाहेर गेला तो व्यक्ती तुमचा नोकर होता का?’ अशी विचारणा करीत तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. तर दुसऱ्याने त्यांचा गळा दाबत मागून हात धरले. पत्नीचा आवाज ऐकून घरात फ्रेश होत असलेले किरण बच्छाव देखील पुढे आले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील हात बांधत त्यांना मागील बाजूला घेऊन गेले. घरातील पैसे आणि दागिने कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी तो दरवाजा खराब असल्याचे सांगितले.

दरोडेखोरांनी किरण बच्छाव यांच्यावर चाकूने वार केले परंतु ते थोडक्यात चुकले. बंदुकीने देखील गोळी झाडण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला मात्र केवळ त्यातून आवाज आल्याचे समजते. किरण बच्छाव यांच्या पत्नीने खिडकीतून जोरात आवाज दिला असता शेजारील महिलेने सर्व दृश्य पाहिले व आरडाओरडा केली. बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी एक आयफोन हिसकवला आणि मागील बाजूने पळ काढला.

दरम्यान, घरात ६ दरोडेखोर शिरले होते त्यापैकी एकाकडे पिस्तूल तर दोघांच्या हातात चाकू असल्याचे समजते. पिस्तूल नकली असल्याची माहिती समोर आली आहे. घराच्या मागील बाजूस ३०० मीटर अंतरावर आयफोन, जॅकेट, मफलर आणि मिरची पूड पॅकेट मिळून आले आहे. दरोडेखोरांनी तिजोरी आणि डी. डी. बच्छाव व त्यांच्या पत्नी कुठे असल्याची देखील विचारणा केली होती. 

किरण बच्छाव यांच्या फिर्यादवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक एस. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाईला सुरूवात केली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे विदगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनुसार शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी तीन पथक नेमून विदगाव, आव्हाणे आणि जैनाबाद येथे रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी यश सुभाष कोळी (वय-२१), अर्जून नगर ईश्वर कोळी (वय-३०), दर्शन भगवान सोनवणे (वय-२९), करण गणेश सोनवणे (वय-१८), अनिल भानुदास कोळी (वय-३१), सचिन रतन सोनवणे (वय-२७) आणि सागर दिलीप कोळी (वय-२८) सर्व रा. दाजीबा चौक, विदगाव ता.जि.जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.