महाराष्ट्र

कर्णबधिर मुलानं काढलं धोनीच अप्रतिम चित्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । आपल्या दीपस्तंभ मनोबल मध्ये दीपक नावाचा मुलगा आहे. तो जन्मतः कर्णबधिर आहे. वडील शेतकरी आहेत. दीपक खूप सुरेख चित्रं काढतो हे लक्षात आलं, त्यानंतर त्याचा तरुण आणि चेतन यांच्या कोर्सला प्रवेश घेतला, तिथेच लक्षात आलं की दीपकचे यातच उत्तम करिअर होऊ शकते. खरोखरच त्याची चित्र अप्रतिम असतात.

एकदा मुंबईहून आलेल्या माझ्या मित्राने दीपकने काढलेलं धोनीचं अप्रतिम चित्र पाहिलं. माझा मित्र म्हणाला, आमच्या गल्फ कंपनीचा धोनी ब्रँड अँबेसिडर आहे. त्याला आपण हे चित्र पाठवू, नंतर काही दिवसांनी त्याचा फोन आला की ते चित्र स्कॅन करून मला पाठव, आणि अशा रीतीने ते चित्र धोनीपर्यंत पोहोचलं. हे चित्र एका कर्णबधिर मुलाने काढलं आहे, तो तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याला तुम्हाला हे चित्र स्वहस्ते द्यायचं आहे असं माझ्या मित्राने धोनीला आवर्जून सांगितलं.

त्यानंतर काही दिवसातच मुंबईला धोनी त्यांच्या गल्फ कंपनीच्या शूटिंगसाठी येणार आहे असा निरोप माझ्या मित्रानी दिला आणि दहा मिनिटं धोनी आम्हाला भेट देऊ शकेल असाही निरोप दिला. मला आनंद झालाच पण दीपकचा आनंद मात्र शब्दातीत होता. प्रताप इंगळे, कविता देसले आम्ही मुंबईला गेलो आणि फिल्म सिटीत धोनीला भेटलो.

अतिशय ग्रेट व्यक्तिमत्व ! गेली सोळा वर्षे मी क्रिकेटचे सामने फारसे पाहिले नाहीत, परंतु धोनीच्या नेतृत्वात आपण केलेली उत्तम कामगिरी ऐकून होतो. त्याला भेटल्यावर मात्र त्याच्या क्रिकेटच्या कामगिरीपेक्षाही प्रगल्भ आणि उत्तुंग असं त्याचं व्यक्तिमत्व जाणवल. अतिशय प्रेमाने आणि नम्रतेने त्याने आमच्याशी संवाद साधला. दीपस्तंभच्या कामाचं कौतुक केलं आणि मनोबलला भेट देण्याचे प्रयत्न करतो असंही सांगितलं.

या ग्रेट भेटीसाठी गल्फ कंपनीचे मनापासून आभार ! विशेष आभार माझ्या मित्राचे , ज्याला हा विचार सुचला आणि त्याचा पाठपुरावा करून त्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं.

Related Articles

Back to top button