दुचाकी घसरून पडल्याने महिलेचा जागेवरच मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा समोर आल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यात दुचाकी घसरून पडल्याने ३० वर्षीय महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. ही घटना ३० सप्टेंबर रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद फाट्याजवळ घडली. चित्राबाई शालीग्राम पाटील (३०, रा. ताडेपुरा, अमळनेर) असे मयत महिलेचे नाव असून याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत असे कि, अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथे चित्राबाई पाटील या आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्या शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मामेभाऊ व मुलासोबत दुचाकीने म्हसावद फाट्याजवळून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा समोर आला. त्यामुळे चालकाने अचानक ब्रेक दाबला.
त्यात दुचाकी घसरल्याने चित्रबाई या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. मयत महिलेच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. चित्राबाई यांचे पती शालीग्राम पाटील यांचे दोन महिन्यापुर्वीच निधन झाले होते. दोन महिल्यापुर्वीचे पितृछत्र हरविलेल्या दोन्ही मुलांचे आता मृतछत्रही हिरावले गेले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.