महिलेने नऊ वर्षीय मुलीसह उचललं टोकाचं पाऊल, एरंडोलमधील हृदयद्रावक घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२४ । एरंडोलमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. घरात गळफास घेऊन महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सपना प्रकाश माळी (वय ३३) व केतकी माळी (वय९) असे मृत माय लेकींची नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. सपना माळी या घटस्फोटीत एकल पालक होत्या
एरंडोल येथे जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात सपना माळी या माहेरी मुलीसह राहत होत्या. गुरुवारी तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता.मृत महिलेचा भाऊ राहुल माळी हा घरी गेला असता त्याला त्याची बहीण सपना व भाची केतकी हे घरी दिसले नाहीत. म्हणून त्याने तिसऱ्या मजल्यावर जाऊन बघितले असता खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. त्याने बहिणीला आवाज दिला असता काही एक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने त्याचा चुलत भाऊ मोहन महाजन याला फोन करून ही घटना सांगितली.
त्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडला नाही. सुताराला बोलवुन दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडला असता सपना व केतकी या दोघी मायलेकी छताच्या वेगवेगळ्या कडीला दोराने गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आल्या. हे दृष्य पाहून भाऊ राहुल याने एकच आक्रोश केला.
मृत सपना माळी या घटस्फोटीत एकल पालक होत्या. घटनास्थळी गादीवर वही मिळून आली असून त्यात त्यांनी आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केलेला आहे. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली.