जळगाव लाईव्ह न्यूज । १९८८ सालची ती गोष्ट… ला.ना. सार्वजनिक हायस्कूलमधून एसएससी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आज, बरोबर ३७ वर्षांनी पुन्हा एकदा ते सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. हा नुसता मेळावा नव्हता, तर धावपळीच्या आणि मोबाईलच्या चौकटीत अडकलेल्या जीवनातून बाहेर पडून मैत्रीच्या जुन्या नात्याला नवसंजीवनी देणारा एक अविस्मरणीय सोहळा होता.

शिक्षक आणि मित्रांचा सन्मान
या मेळाव्याची सुरुवात खूपच हृदयस्पर्शी होती. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी, या बॅचच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हयात असलेल्या शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन त्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दुसर्या दिवशी आर्यन पार्क येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंजाबी पोषाखात आणि ढोलकीच्या गजरात मित्रांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मैत्रीचे प्रतीक म्हणून प्रत्येकाच्या हातात तिरंग्याच्या रंगाचे बँड बांधण्यात आले.’९०’ च्या दशकात परतले सारेमेळाव्याची खरी मजा ’९०’ च्या दशकातील आठवणी जाग्या करण्यात होती. विटी-दांडू, गोट्या आणि खुपसणीसारखे जुने खेळ खेळले गेले.

विलास सांगोरे यांनी शाळेची घंटा वाजवून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि सारेजण भूतकाळात रमून गेले. निवेदिका अपूर्वा वाणी यांनी प्रत्येक मित्राची ओळख करून देत त्यांच्या आवडी-निवडींवर गप्पा मारल्या. तब्बल दोन तास विविध खेळ आणि मनोरंजनामुळे ५० च्या आसपास असलेली ही पिढी जणू पुन्हा एकदा बालपणीच्या हिंदोळ्यावर झुलत होती.गायन आणि जल्लोषया सोहळ्यात अनेक मित्रांनी आपल्या सुप्त गुणांना वाव दिला. प्रभाकर जाधव, डॉ. अजय शास्त्री, सुधाकर माळी यांनी सदाबहार गाणी गायली. मिलिंद कुलकर्णी यांनी माउथ ऑर्गन वाजवून वातावरण मंत्रमुग्ध केले, तर गणेश भोळे यांनी सादर केलेल्या ’भोळे ओ भोळे’ गाण्याने धमाल आणली. डीजेच्या तालावर नाचताना सर्वांनी आपले वय विसरून मनसोक्त आनंद घेतला.
श्रद्धांजली आणि निरोप
कार्यक्रमाच्या शेवटी, त्यांनी आपल्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली. ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या मित्रांसोबत केक कापून आनंद साजरा करण्यात आला. स्नेहभोजनानंतर एकमेकांना निरोप देताना प्रत्येकाचे डोळे पाणावले. विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन या दिवसाची आठवण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.उच्च पदस्त असो किंवा सामान्य व्यक्ती, गरीब असो किंवा श्रीमंत, कोणताही भेदभाव न करता ही पिढी एकत्र आली. आजच्या टीव्ही आणि मोबाईलच्या युगात या स्नेहमेळाव्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशस्वी कार्यक्रमासाठी राहुल कुलकर्णी, मनीष जोग, डॉ. नारायण सूर्यवंशी, विलास सांगोरे, दर्शन पाटील, संजय वाणी, निखिल जकातदार, नंदू आडवाणी, सचिन माळी, संजय पाटील, गणेश भोळे, नीलम जोशी दलाल, वैशाली जोशी ढेपे, आनंद तारे, ललित तावडे, रवी गावडे, सुधाकर माळी, देवेंद्र विसावे, अमोघ जोशी, प्रशांत पाटील आणि धर्मेंद्र चंदनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.







