शर्टाचे बटण थेट श्वासनलिकेत अडकले, डॉक्टरांनी वाचवला बालिकेचा जीव
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । दोन वर्षीय बालिकेने खेळताना शर्टाचे बटण थेट नाकात घातले. हे बटन श्वासनलिकेत अडकून तिचा जीव गुदमरू लागला.हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले.तेथे डॉक्टरांनी तत्परता दाखवत अडकलेले शर्टाचे बटण तत्परतेने काढून प्राण वाचवले. शनिवारी दुपारची ही घटना असून जीवदान मिळालेल्या बालिकेचे नाव अनिता लालसिंग बारेला आहे.
यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा जवळील धरण वस्तीवर लालसिंग बारेला हे कुटुंबीयांसह राहतात. शनिवारी दुपारी त्यांची दोन वर्षीय बालिका अनिता ही घरात खेळत होती. यावेळी तिच्या हातात शर्टाचे बटण आले. हे बटण आपल्या नाकात घातले. मात्र, ते पुढे खोलवर शिरून श्वास नलिकेत अडकल्याने तिला त्रास सुरू झाला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी घरीच बटण काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात अडकलेले बटण अजून आतमध्ये जाऊन श्वासनलिकेत अडकल्याने अनिताचा जीव गुदमरू लागला. यामुळे तिला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. येथे डॉ. निखिल तायडे, डॉ. इरफान खान, आरोग्यसेविका सुमन राऊत, प्रवीण बारी यांनी तिच्या श्वासनलिकेत अडकलेले बटण बाहेर काढले. यामुळे बालिकेने सुटकेचा श्वास घेतला. अनिताला वेळीच रुग्णालयात आणले नसते तर तिच्या जिवावर बेतले असते. मात्र डॉक्टरांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरून जीवदान मिळाले.
कौशल्य वापरून काढले बटण
अनिताच्या नाकात अडकलेले शर्टाचे बटण हे खूपच चिकन होते. ते काढताना चिमट्याची पकड देखील बसत नव्हती. त्यामुळे बारीक आकाराचे चिमटे वापरताना बालिकेले हालचाल करू नये व सोबतच तिला त्रास होऊ नये याची काळजी डॉक्टरांनी घेतले. वैद्यकीय कौशल्य वापरून नाजूक भागात अडकलेले बटण दोन्ही डॉक्टरांनी अलगद बाहेर काढले.