अरे बापरे : पोलिसांच्या वाहनावरच आदळला वाळूची वाहतूक करणारा ट्रक
जळगाव लाईव्ह न्यूज : १६ मार्च २०२३ : नंदुरबार जिल्ह्यात वाळूची वाहतूक करणारा भरधाव ट्रक पोलिसांच्या गस्ती वाहनावर आदळून झालेल्या अपघातात पोलीस निरीक्षकासह चौघे जण जखमी झाले. हा अपघात नंदुरबार-तळोदा रस्त्यावरील सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला.
अपघातात पोलीस वाहनाचे नुकसान
बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार पोलिसांचे गस्तीवाहन (क्रमांक एम.एच. 12 एस.क्यू.1048) हे तळोदा येथून नंदुरबार गस्तीवरून परतत असताना सुदर्शन पंट्रोलपंपजवळ वाळू वाहतू करणारा ट्रक (क्र.एम.एच.14. एफ.टी.5167) ने धडक दिल्याने पोलिसांच्या वाहनाचे जबर नुकसान झाले तर हा ट्रक चालक सचिन दशरथ शिरसाठ चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ट्रकच्या धडकेने पोलीस वाहनातील निरीक्षक राजेंद्र दगडु भावसार (नियंत्रण कक्ष नंदुरबार), कॉन्स्टेबल प्रकाश परशुराम कोकणी (पोलीस मोटार वाहन विभाग नंदुरबार), कॉन्स्टेबल रवींद्र सावळे (पोलीस मुख्यालय, नंदुरबार), कॉन्स्टेबल रवींद्र सुकलाल सावळे (पोलीस मुख्यालय, नंदुरबार) यांना गंभीर दुखापत झाली. कॉन्स्टेबल रवींद्र सुकलाल सावळे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात ट्रक चालक सचिन दशरथ शिरसाठ (रा.नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा.निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.