⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

स्वत: दीड लाख खर्चून गिरणा नदीवर उभारला हंगामी पूल; वाचा एक शेतकर्‍याच्या दातृत्वाची कहाणी

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ डिसेंबर २०२२ | नदी व खोल दरी ओलांडून डोक्यावर पाण्याचे दोन-तीन हंडे घेवू पाणी भरणार्‍या महिलांचा व्हिडीओ व फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पिण्याच्या पाण्यासाठी ही जीवघेणी कसरत नाशिक जिल्ह्यातील एका गावात करावी लागत असल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित नदीवर तात्काळ पूल उभारण्याच्या सुचना दिल्यानंतर तेथे प्रशासनातर्फे एक लोखंडी पूल उभारण्यात आला होता. नदी ओलांडण्यासाठी अशीच जीवघेणी कसरत भडगाव तालुक्यात गिरणा नदी ओलांडतांना करावी लागत होती. यासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता एका शेतकर्‍याने स्वत: दीड लाख रुपये खर्चून हंगामी लोखंडी पुल उभारला आहे. गावाकर्‍यांच्या हितासाठी माधवराव महाजन यांनी घेतलेल्या या पुढाकाराचा स्पेशल रिपोर्ट….

गेल्या आठवड्यात गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आले असल्याने गिरणामाई खळखळून वाहत आहे. या आवर्तनामुळे जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव तालुक्यात गावांमधील पिण्याच्या सिंचनाचा प्रश्‍न सुटला आहे. मात्र दुसरीकडे नदीला पाणी असल्याने अनेक ठिकाणी नदी ओलांडणे कठीण झाले आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी व गावकर्‍यांना लांबवर असलेल्या पर्यायी मार्गाने नदी ओलांडवी लागत आहे. भडगाव तालुक्यातील भातखंडे बु. गावात अशीच परिस्थिती होती. नदीला पाणी असल्याने भातखंडे ते पाचोरा हे २२ किमीचे अंतर पार करावे लागत होते.

ही परिस्थिती पाहून भातखंडे येथील संवेदनशिल शेतकरी माधवराव महाजन यांनी गावकर्‍यांचा वेळ व पैसा वाचावा यासाठी स्वखर्चाने हंगामी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गावकर्‍यांच्या मदतीने सुमारे १५० फुट लांब व साडेचार फूट रुंद पूल उभारला. सुरक्षेसाठी पूलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळ्या देखील लावण्यात आल्या. यासाठी सुमारे ७५० वाळूच्या गोण्यांचा भराव करण्यात आला आहे. या पूलामुळे भातखंडे ते पाचोरा हे २२ किमीचे अंतर अवघ्या ७ किमीवर आले आहे. या पुलावरुन ये-जा करणार्‍या दुचाकीस्वारांकडून ५ ते १० रुपये किंवा स्वच्छेने देतील तेवढी रक्कम घेतली जाते. मात्र पादचारी व सायकलस्वारांसाठी हे मोफत आहे. भडगाव तालुक्यातील हा प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा व कौतूकाचा विषय ठरत आहे.