⁠ 
बुधवार, फेब्रुवारी 28, 2024

Pahur Accident : ट्रकने सायकलस्वार बाप-लेकीला उडविले ; मुलीचा जागीच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२३ । भरधाव ट्रकने सायकलस्वार वडील व मुलीस जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वडील जखमी झाल्याची घटना पहूर-छ.संभाजीनगर महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ घडली. अपघातातील मृत ज्ञानेश्वरी शंकर भामेरे (११) ही पाचवीतील विद्यार्थिनी शुक्रवारी होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनात निवड प्रक्रियेसाठी शाळेकडून पत्र घेऊन जळगावाला येणार होती. त्याआधीच हा अपघात झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर भामरे हे सायकलने आपली मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिस बस स्टॅन्ड वर घेऊन जात होते. याच दरम्यान, पहूर ते संभाजीनगर महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ त्यांच्या सायकलला मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक (एम.एच. २३ ऐ.यु ५५८२) या गाडीने जोरदार धडक दिली.

त्यात शंकर भामरे व त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी (वय११) रस्त्यावर फेकले गेले. यात ज्ञानेश्वरी हिचा जागीच मृत्यू झाला. तर वडील शंकर भामरे हे जखमी झाले आहे. दरम्यान आयशर चालक सुनिल ग्यानदेव सोनवणे (रा.अंजनवटी जिल्हा बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलेली आहे.