---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल घडत आहे. जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून मिळालेल्या २८ कोटींपेक्षा अधिक निधीच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे केवळ आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावली नाही, तर गोरगरिबांसाठी उपचारांची नवी क्षितिजे खुली झाली आहेत. त्याचा या लेखात घेतलेला आढावा…!!

medical hub

उन्हाळ्यात जिल्ह्याचे तापमान ४४ अंश सेल्सियसच्या आसपास जात असल्यामुळे, मूत्रपिंडातील खड्यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही गरज ओळखून विद्युतचुंबकीय लहरीद्वारे खडे दूर करणारी प्रणाली (ESWL) प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. टाके न घालता खडे निघून जाणारी ही सुविधा ८.९९ कोटी रुपये निधीच्या सहाय्याने उभारण्यात आली असून, ती आता रुग्णांच्या सेवेत आहे.

---Advertisement---

“शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांची पहिली आशा असते. ही आशा कायम राहावी यासाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा आवश्यक होत्या. त्या आम्ही पाठपुरावा करून उपलब्ध करून दिल्या,” असे मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या ३ टेस्ला क्ष-किरण चुंबकीय अनुनाद चित्रण (MRI) यंत्राच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

जळीत रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष

दरवर्षी शेकडो जळीत रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. त्यांच्या स्वतंत्र उपचारासाठी ४.२४ कोटी रुपये निधीमधून जळीत कक्षाची उभारणी करण्यात आली असून, त्याचे ९०% काम पूर्ण झाले आहे. यामुळे संसर्गाचा धोका कमी होणार असून रुग्णांना अधिक जलद व प्रभावी उपचार मिळणार आहेत.

त्याचप्रमाणे, २.९४ कोटी रुपये निधीच्या सहाय्याने अतिदक्षता विभाग (ICU) उभारण्यात आला आहे. १५ जुलै २०२४ पासून हा विभाग कार्यरत असून, अतिविकट अवस्थेतील रुग्णांवर तातडीने उपचार देण्यासाठी तो महत्त्वपूर्ण ठरला आहे. अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात या सुविधेचा मोलाचा वाटा आहे.

“काही वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात आरोग्यसेवेची स्थिती समाधानकारक नव्हती. किरकोळ उपचारांसाठीसुद्धा रुग्णांना नाशिक, मुंबईकडे जावे लागायचे. आज या सुविधा प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्याचे पाहून समाधान वाटते. ही खरी आरोग्यक्रांती आहे,” असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

प्रयोगशाळा व यंत्रसामग्रीने सज्ज सेवा

शरीरविकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जीव-रसायनशास्त्र विभागांतून आजतागायत ५.५ लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासाठी २.३९ कोटी रुपये निधी वापरण्यात आला.

याशिवाय, हृदयचित्रण (ECG), पूर्णपणे स्वयंचलित तपासणी यंत्र, विद्युतशस्त्रक्रिया यंत्र, ध्वनिलहरी कापणारे उपकरण, बहुपरिमाणी निरीक्षण यंत्र, भूल कार्यस्थान यंत्रणा अशा आधुनिक उपकरणांची २.८९ कोटी रुपयांमध्ये उपलब्धता करण्यात आली आहे. याचा लाभ आतापर्यंत ८४,६९९ रुग्णांनी घेतला आहे.

कान, नाक, घसा व शस्त्रक्रिया विभागासाठी विशेषतः शस्त्रक्रिया सूक्ष्मदर्शक, सूक्ष्मकापणी प्रणाली, उदरशस्त्रक्रियेची उपकरणे व प्रगत आघात सिम्युलेटर यांसारखी यंत्रणा २.१८ कोटी रुपये निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MRI यंत्र — ऐतिहासिक टप्पा

३ टेस्ला क्ष-किरण चुंबकीय अनुनाद चित्रण यंत्र (MRI) ही सुविधा शासकीय रुग्णालयासाठी मोठे पाऊल ठरले आहे. *एचएससीसी इंडिया लि.*च्या टर्नकी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले हे यंत्र ३ मे २०२५ पासून कार्यरत आहे. अचूक आणि जलद निदानक्षमतेमुळे आता सामान्य जनतेला कमी खर्चात आणि वेळीच उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

“आरोग्य सेवा ही केवळ सुविधा नसून ती लोकांचा मूलभूत अधिकार आहे. जिल्ह्यात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा उपलब्ध करून देणे ही लोककल्याणकारी गुंतवणूक आहे,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमूद केले.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर सांगतात, “यंत्रसामग्री खरेदी ही केवळ एक पायरी असते. त्याचा प्रभावी वापर हे खरी कामगिरी आहे. प्राध्यापक, निवासी डॉक्टर व परिचारिका यांनी यासाठी सातत्याने मेहनत घेतली आहे. त्यातून आरोग्यसेवेची खरी दिशा ठरते.”

जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य सेवेसाठी उभारलेली ही सुविधा आकडेवारीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या दिलास्याच्या हास्यातून उमगते. ही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आरोग्य क्रांती आहे.

– युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment