जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । एकीकडे जळगाव जिल्ह्यात विविध चोरीच्या घटना वाढलेले असताना अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई-वडील शेतात काम करीत असताना झाडाला बांधलेल्या झोक्यातून दोन वर्षांच्या चिमुकलीला अज्ञाताने उचलून नेले. हा प्रकार जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात घडली असून याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, धुळे जिल्ह्यातील झेंडे अंजन (ता. शिरपूर) येथील दाम्पत्य जळगाव तालुक्यातील देवगाव येथील शिवारातील एका शेतात सालदार म्हणून कामाला आहे. रविवारी दुपारी या दाम्पत्याने शेतात एका झाडाला झोका बांधून सुमिना आमाश्या पावरा (२ वर्षे) या चिमुकलीला झोपविले होते.मुलीची आई शेतात काम करीत असताना व वडील मालकासोबत गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने झोक्यातून चिमुकलीला काढून नेले. या मुलीची आई झोक्याजवळ आली त्यावेळी तिला चिमुकली झोक्यात दिसली नाही. याप्रकरणी हिराबाई आमाश्या पावरा यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनंत अहिरे करीत आहेत.
कुटुंब झाले कावरेबावरे पावरा दाम्पत्याला एक मुलगा व दोन मुली आहेत. यातील सर्वात लहान सुमिना या दोन वर्षांच्या मुलीला झोक्यातून कोणीतरी घेऊन गेल्याने दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. मुलगी सापडत नसल्याने हे दाम्पत्य कावरेबावरे झाले आहे.