⁠ 
सोमवार, मे 6, 2024

देवगावला घर फोडले, पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । चोपडा तालुक्यातील देवगाव येथे घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी कपाट फोडून रोकडसह तब्बल पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुभाष प्रकाश महाजन हे कुटुंबासह देवगाव येथे राहतात. देवगावला त्यांची दोन घरे आहेत. दि.८ रोजी ते आपल्या कुटुंबासह सुरत येथे वैयक्तिक कामासाठी गेले होते. चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या नव्या घरी डल्ला मारला. दि.१२ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास नव्या घरात चोरी झाल्याचे मुलगा राजेश याच्या लक्षात आले. त्याने लागलीच फोनवरून वडिलांना कळविले.

चोरट्यांनी घरातील कपाट फोडून महाजन यांच्या किराणा दुकानांचे ८५ हजार रुपयांची रोकड तर ८७ हजार रुपयांचे दागदागिने असा एकूण १ लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.