कर्मचाऱ्यांच्या पीएफसाठी उद्या होणार सुनावणी
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेने कर्मचाऱ्यांना पीएफचे ६ कोटी ५० लाख रुपये न दिल्याने नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी जप्तीचे आदेश दिले आहेत. या संस्थेचे चार बँक खाते सील करण्यात आले आहे. या संदर्भात बीएचआर अवसायकांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर उद्या ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
बीएचआर पतसंस्थेमध्ये कार्यरत असलेल्या दोन हजार कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या १३ कोटी रुपयांची रिकव्हरी पीएफ कमिशनर यांनी काढली आहे. ही पतसंस्था अवसायनात जाण्यापूर्वी संचालक मंडळ कार्यरत असताना बीएचआरचे ६ कोटी ५० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. सद्यःस्थितीत ही पतसंस्था अवसायनात आहे.
कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे उर्वरित ६ कोटी ५० लाख रुपयांच्या रिकव्हरीसाठी पीएफ कमिशनर नाशिक यांनी जप्ती आदेश दिलेले आहेत. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात बीएचआर अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी रिट पीटिशन दाखल केलेली आहे.