जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहराला लागून असलेल्या जुना खेडी परिसरातील किराणा दुकानाला भीषण आग लागली. या आगीत ३० हजारांचा सामान जळून खाक झाला असून याबाबत अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. परंतु आग लागण्यापूर्वी दुचाकीस्वार दोन जण दुकानासमोर थांबले व त्यानंतर स्फोट झाल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे दुकानाला आग लावून घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय या घटनेत व्यक्त होत आहे.
याबाबत असं कि, खेडी परिसरामधील योगेश्वर नगरातील गोपाल सुरेश चौधरी यांच्या घराबाहेर काढलेल्या छोट्या किराणा दुकानाला शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोळ दिसल्याने परिसरातील नागरिकांनी दार ठोठावून त्यांना ही माहिती दिली. तसेच अग्निशमन विभागाला फोनद्वारे कळवले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या दोन अग्नीशमन बंबांनी २० मिनिटात आग आटोक्यात आणली. दरम्यान आगीत सुमारे ३० हजाराचे किराणा सामान जळून खाक झाल्याचे चौधरी यांनी सांगितले.
चौधरी यांचे किराणा दुकान आहे. या परिसरातील एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये १:३०:४० या वेळेला एक दुचाकी आली. त्यावरून एक जण खाली उतरल्यानंतर दुकानाजवळ एकदम प्रकाश चमकल्याचे दिसत आहे. त्यानंतर ही दुचाकी पसार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार दोघांवर संशय आहे. पोलिस परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहेत.