चाळीसगाव

आगीत खाक झाले शेतकऱ्याचे घर घेण्याचे स्वप्न, लाखोंच्या रोकडसह दागिने, साहित्याची राख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील शेतकऱ्याच्या घराला गॅस गळतीमुळे आग लागल्याची घटना रविवारी घडलीय. या आगीत नवे घर घेण्याचे शेतकऱ्याचे स्वप्न जळून खाक झाले आहे. या आगीत घर घेण्यासाठी आणलेली रोकड, सोन्याचे दागिने व साहित्यसह सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी पंचनाम्यात वर्तवला आहे.

याबाबत असे की, पोहरे येथील शेतकरी केशव राघो माळी हे मधुकर माळी यांच्या मातीच्या घरात भाडेतत्त्वावर राहतात. केशव माळी यांच्याकडे दोन एकर जमीन आहे. रविवारी ते घराला कुलूप लावून शेतात निघून गेले. घर बंद असताना गॅस गळतीमुळे घराला आग लागली. बाहेर धुराचे लोट निघू लागल्यानंतर शेजाऱ्यांना ही घटना समजली. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे माळी यांना आगीची माहिती कळवली. तसेच ग्रामस्थांनी दरवाजा उघडून पाण्याचा मार केला. घर मातीचे असल्याने, लाकडांनी लागलीच पेट घेतला होता. त्यामुळे काही वेळातच घराचे छतही कोसळले. सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कुणीही नसल्याने हानी टळली. ग्रामस्थांच्या प्रयत्नाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळाले.

नवे घर घेण्याचे स्वप्न जळून खाक
केशव माळी हे आज सोमवारी घर खरेदीची प्रक्रिया करणार होते. परंतु त्यापूर्वी नवे घर घेण्याचे शेतकऱ्याचे स्वप्न जळून खाक झाले आहे. केशव माळी यांनी ७ लाख ७० हजार रुपये नवीन घर घेण्यासाठी नातेवाइकांकडून आणले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांना कपाशी विक्रीतूनही पैसे मिळाले होते. सर्व रोकड त्यांनी घरातील कोठीमध्ये ठेवली होती. ही रोकड आगीत अर्धवट जळाली. तसेच ॲल्युमिनियमच्या डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे दागिनेदेखील वितळून नुकसान झाले. घराच्या शेजारी असलेल्या दगा माळी यांच्याही घराचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. घरातील संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाले. नवीन घर घेण्यासाठी आणलेली रोकड आगीत जळाल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले.

दरम्यान, याप्रकरणी मेहुणबारे येथील पीएसआय योगेश ढिकले, पोलिस नाईक प्रताप मथुरे यांनी पंचनामा केला. दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनीदेखील आगग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत केली.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button