जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस कार्यालयातच कौटुंबिक वादातून समुपदेशनासाठी महिला दक्षता कक्षात आलेल्या पती-पत्नीच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत महिलांचाही सहभाग होता. यामुळे पोलीस यंत्रणा हादरून गेली. शेवटी दोन्ही कडील मंडळी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये आले.

सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जळगाव शहरातील डी मार्ट येथे एक विवाहिता राहत असून तिचा विवाह चाळीसगाव येथील एका व्यक्तीशी दोन वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नीमध्ये दोन वर्षांमध्ये वाद-विवाद होऊ लागल्याने हा वाद विकोपाला गेला. त्यांच्यात समझोता घडवण्यासाठी त्यांना महिला दक्षता या ठिकाणी अर्ज करण्यात आलेला होता.
सोमवारी पहिल्याच तारखेला दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास दोन्ही कडील मंडळी समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ व मानहानी पर्यंत मजल गेली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. एकमेकांवर हल्ले होऊ लागल्याने पळापळ झाली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मुलाकडील व मुलीकडील मंडळी बाहेर जाऊन थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. जिल्हा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता पती-पत्नी कडील मंडळी पोलीस स्टेशनला आलेली असून परस्परांविरुद्ध तक्रार दिली जात आहे.