जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । जळगाव खुर्द गावाजवळ रेल्वेवरील उड्डाण पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरु असून अपघातग्रस्त जागा म्हणून महामार्गावर ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लाॅकवरच भरधाव वेगाने दुचाकी धडकल्याने नशिराबाद येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. विजय मुरलीधर पाटील (वय ६५ रा. नशिराबाद) असं मयत शेतकऱ्याचं नाव असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे विजय मुरलीधर पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास असून ते काल शनिवारी सकाळी खाजगी कामानिमित्ताने विजय पाटील हे एम.एच. १९. ६९३३ या क्रमांकाच्या दुचाकीने रावेर तालुक्यातील पिंपळगाव येथे जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर पोहचल्यावर महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहनधारकांना कल्पना यावी म्हणून या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आले. वळणावर रस्त्यात टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या ब्लॉकचा अंदाज न आल्याने विजय पाटील यांची दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर धडकली.
ही धडक एवढी जाेरदार हाेती की, त्यांची माेटारसायकल ब्लाॅकवर जावून आदळली व त्यालाच टेकून थांबली.पाटील यांचा गाडीवर बसलेल्या अवस्थेतच डाेक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव हाेवून मृत्यू झाला.विजय पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.