मंगळवार, सप्टेंबर 19, 2023

पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; जामनेर तालुक्यातील खळबळजनक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । जामनेर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह पोत्यात कोंबून जंगलात फेकून देण्यात आल्याची घटना लहासर परिसरातील जंगलात उघडकीस आली. मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलं असून या प्रकरणी पोलिसांनीच स्वत: फिर्यादी होवून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

जामनेर बोदवड रोडवरील लहासर जंगलात पोत्यात बांधलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळून आला. लहासर शिवारातील जंगलात दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुराखी गुरे चारत होता. यावेळी तेथे त्याला दुर्गंधी आली. त्याने आजूबाजूला पाहिले असता एका पोत्यातूनच ही दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार त्याने गावात कळवला. ग्रामस्थांनी लगेच पोलीस ठाण्याची संपर्क साधला. त्यानंतर जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळ गाठले.

बांधलेले पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळून आला. मयत प्रौढाचे हात-पाय बांधून पोत्यात भरून ठेवल्याचे तपासणीत तसेच पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. साधारणात एक महिन्यापूर्वी संबंधिताचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी खून करुन मृतदेह पोत्यात भरुन त्याला जंगलात फेकून त्याची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनास्थळी चाळीसगाव आणि पाचोरा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याबाबत पोलीस कर्मचारी नीलेश वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.