जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात या ना त्या कारणावरून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशातच आता जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळ ३०० रुपये न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटनाघडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय संजय अकोलकर (वय २०, रा. मारुती मंदिरजवळ, शिवाजीनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी सकाळी १०:३० वाजता अक्षय अकोलकर हा रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळील नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी आला होता.त्यावेळी त्याच्या ओळखीचा गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर (रा. शिवाजीनगर) हा तिथे आला. त्याने अक्षयकडे ३०० रुपये मागितले. नाहीतर ‘तुझ्या अंगावरील कोट दे’ असे सांगून अक्षयच्या अंगावरील कोट हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गजाननने धारदार शस्त्र काढून अक्षयवर वार केले.
त्यामुळे त्याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. यात जखमी झालेल्या अक्षयला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल किशोर निकुंभ करत आहेत