जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२३ । महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नसून अशातच फैजपूर शहरात खळबळजनक प्रकार घडला आहे. 30 वर्षीय महिलेच्या घरात जाऊन तरुणाने तिला धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली.
नेमकी घटना काय?
फैजपूर येथील महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास महिला आपल्या घरात झोपली होती. त्यावेळी शेख आरिफ शेख जाबीर (वय २६) हा तरुण तिच्या घरात आला आणि जर कोणाला काही सांगितले आणि आवाज काढला तर मी सांगेल की, तुझे-माझे पूर्वीपासून अनैतिक संबंध आहेत, अशी धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तेथून फरार झाला.
हा प्रकार महिलेने कुटुंबियांना सांगितला. शुक्रवारी पहाटे पूर्वी फैजपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित शेख आरिफ शेख जाबीर यास पोलिसांनी अटक केली. त्याची यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील तपास फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार चेतन महाजन, हर्षल चौधरी, गुलबक्ष तडवी आदी करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली अाहे.