⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | रात्री लग्न, पहाटे दागिने घेऊन नववधू पसार ; जळगावात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

रात्री लग्न, पहाटे दागिने घेऊन नववधू पसार ; जळगावात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । आजकाल मुलांची लग्न जमवणे अत्यंत कठीण कार्य झाले आहे. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने याच गोष्टीचा फायदा घेत लग्न जमवण्याचे नाटक करून फसवणूक करणारे अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. यातच जळगावात एक लाख रुपये देऊन लग्न पार पडले अन् घरी आल्यानंतर थकल्यामुळे सर्व जण घरात गाढ झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास लग्नातील सोन्याचे दागिने घेऊन नववधू पसार झाली. विशेष म्हणजे, येथून पसार झाल्यानंतर याच तरुणीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर, तेथेही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लग्न जुळविणाऱ्या पूजा विजय माने (३२, रा.महाडिकवाडी, सांगली), नववधू नंदिनी राजू गायकवाड (रा.अकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात सोमवार, २२ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, महानगरपालिकेत व्हॉलमन म्हणून नोकरीस असलेले शरद काशिनाथ चौधरी यांचा मुलगा मयूर याचे लग्न करायचे असल्याने, त्या संदर्भात १३ फेब्रुवारी रोजी त्यांना पूजा विजय माने या महिलेचा फोन आला. तिने आमच्याकडे मुलगी असून तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे येऊन मुलगी बघून घ्या, असे सांगितले. मुलगी पाहिल्यानंतर पसंती झाली व माने या महिलेने त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली, परंतु चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले. १६ मार्च रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीमध्ये मयूर चौधरी याचे नंदिनी गायकवाड या तरुणीसोबत लग्न लागले. यावेळी मुलीकडून पूजा माने, नंदिनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ असे हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले

लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी सर्व जण घरी परतले. दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री सर्व जण गाढ झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास नववधू नंदिनी व तिची मैत्रीण या घरात दिसल्या नाहीत. त्यामुळे चौधरी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना सांगितले की, पहाटेच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रिणीला जाताना पाहिले.

नववधूसह तिची मैत्रीण घरातून निघून गेल्याचे चौधरी यांनी पूजा माने या महिलेला सांगितले असता, तिने शोध घेऊन सांगते असे म्हणत आपला मोबाइल बंद करून ठेवला. बरेच दिवस संपर्क झालाच नाही. चौधरी यांचे साहू रवींद्र चौधरी हे त्यांना भेटले असता, त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी पूजा व नंदिनीने फसवणूक करून लग्न दुसऱ्याशी लावून दिला विवाह, तेथूनही पसार लावून दिल्याची बातमी वाचली. त्यावेळी चौधरी यांना समजले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिरुर येथे पूजा माने या महिलेने नंदिनीचे वैजापूर तालुक्यातील तरुणासोबत लग्न लावून दिले आहे. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी चौधरी यांनी शनिपेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, नववधूसह अन्य दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.