जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून जबरी चोरीच्या घटना देखील वाढताना दिसत आहे. अशातच अमळनेरच्या पैलाड येथे वृद्धाचा बँकेपासून पाठलाग करून ५० हजार रुपयांची बॅग हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन मुलाला एका तरुणाने झडप घालून पकडले. तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

पैलाड येथील तुकाराम भोई हे १३ रोजी दुपारी बडोदा बँकेत ५० हजार रूपये काढायला गेले होते. दुचाकीच्या डिक्कीत पैसे ठेवून ते घराकडे निघाले असता दोन मुलांनी एका स्कूटीवर त्यांचा पाठलाग केला. स्कूटीवर बसलेला मुलगा काही अंतरावर थांबला. लहान मुलाला त्याने तुकाराम भोई यांच्याकडे पाठवले. ते दुचाकीच्या डिक्कीतून पैसे काढत असताना अल्पवयीन मुलाने त्यांच्या हातातील पन्नास हजार रुपये पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड करताच जवळच असलेल्या रोहित भागवत पाटील याने त्या अल्पवयीन मुलाला पकडून त्याच्या हातातील पैसे तुकाराम भोई याना परत केले.

हे पाहताच त्याचा साथीदार स्कूटी घेऊन पळून गेला. रोहितने त्या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विचारपूस केल्यावर त्याने, आम्ही दोन जण मध्य प्रदेशातून रेल्वेने अमळनेर आलो. दुसऱ्या मुलाने मला स्टेशनवर थांबवून थोड्या वेळानंतर स्कूटी आणली. नंतर आम्ही त्यावर बसून बँकेजवळ आलो. आणि हे कांड केल्याची कबूली दिली. दरम्यान पोलिस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.











