⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

भुसावळात २९ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू, १५ दिवसापूर्वीच कन्यारत्न प्राप्त झाली होती..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. जळगावातील पारा तब्बल ४३ ते ४५ वर जात असल्याने सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचे भीषण परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आणखी एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

भुसावळ येथे २९ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने सोमवारी मृत्यू झाल्याची माहिती डॉ. राजेश मानवतकर यांनी दिली आहे. गिरीश शालिग्राम पाटील (वय २९, रा.तुकाराम नगर) असं मृत तरुणाचं नाव आहे. गिरीश शालिग्राम पाटील हे पुणे येथे रेल्वेत सेवारत आहे. ते चार दिवसांपूर्वीच तो शहरात आजीचे तेरावे व १५ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहण्यासाठी पुण्यातून आला होता. दरम्यान त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ. राजेश मानवतकर यांनी दिली आहे.

गिरीश पाटील याच्या आजीच्या तेराव्याचा कार्यक्रम १३ मे रोजी झाला. तर पंधरवड्यापूर्वी गिरीशला कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यानिमित्त सासरी गाडेगाव (ता. जामनेर) येथे मुलीला पाहण्यासाठी तो चार दिवसांपूर्वी भुसावळात आला होता. आजीच्या तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रविवारी (दि. १४) गिरीश भुसावळ येथून दुचाकीने गाडेगाव येथे सासुरवाडीला मुलीला पाहण्यासाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. सोमवारी सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान तो भोवळ येऊन घरातच कोसळला. नातेवाइकांनी त्याला डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा रक्तदाब शून्यावर होता.

डॉ. मानवतकर यांनी त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. १० ते १२ मिनिटे उपचार केल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. गिरीशचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ. मानवतकर यांनी दिली. मृत गिरीशच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व एक नवजात मुलगी असा परिवार आहे.

आज होणार शवविच्छेदन :
गिरीशचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. मृतदेहाचे आज (दि.१६) शवविच्छेदन होईल. यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र चाकूरकर यांनी दिली.