जळगाव जिल्हा पुन्हा हादरला ; चॉपरने वार करून तरुणाचा खून
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटनांची मालिका सुरूच असून अशातच जिल्हा आणखी एका खुनाच्या घटनेने हादरला आहे.दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादात एका तरूणाचा धारदार चॉपरने वार करून खून झाल्याही घटना भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात घडली. सय्यद आरिफ सय्यद समद अली (वय २८, रा. वरणगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते
याबाबत अधिक माहिती अशी की, सय्यद आरीफ सय्यद समद अली हा तरूण आई, वडील, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातीलच काही जणांसोबत त्याचे जुने वाद होते. मंगळवारी ४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात त्याने त्याची दुचाकी लावली होती. त्याचवेळी जुना वाद असलेल्या व्यक्तीने देखील त्याच्या दुचाकीजवळ दुचाकी लावली. यामधूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर एकाने तरुणावर चॉपरने तिघांवर प्राणघातक हल्ला केला.
यात सय्यद आरिफ याच्या छातीत चॉपर घुसल्याने तो खाली कोसळला. तर आकिब अली कमर अली (वय-२२) याच्या गळ्यावर, उजव्या हातावर व मुश्ताक अली सय्यद (वय-५०, दोन्ही रा. वरणगाव) यांच्या डोक्यावर वार झाले आहेत. दोघेही जबर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तिघांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सय्यद आरिफ याला मयत घोषित करण्यात आले. तर आकिब व मुश्ताक अली यांच्यावर उपचार सुरु आहेत. मयत आरिफ याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेची वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.