⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अखेर जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदीला सुरुवात ; नावनोंदणीसाठी काय आवश्यक?

अखेर जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदीला सुरुवात ; नावनोंदणीसाठी काय आवश्यक?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । रब्बी ज्वारीची काढणी होऊन, महिना उलटल्यावर देखील शासनाकडून भरडधान्य खरेदीला सुरुवात झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच बाजार समिती व खासगी बाजारात ज्वारीचा भाव हमीभावापेक्षा तब्बल ९०० रुपयांनी कमी झाले होते. अखेर शासनाला जाग आली असून, जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी नावनोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंगच्या वतीने ज्वारीसह भरडधान्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंगचे संचालक यांनी दिली. शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत जिल्हा मार्केटिंगमध्ये नोंदणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात जवळपास ज्वारी काढून, ज्वारी शेतकऱ्यांच्या घरात आली होती. मात्र, शासनाकडून तेव्हा ज्वारी खरेदीला सुरुवात करण्यात आली नाही. शासकीय खरेदी सुरु न झाल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून ज्वारीची खरेदी केली जात होती. हमीभाव ३ हजार १८० रुपये एवढा असताना, बाजार समितीत ज्वारीला २२०० रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी सुरु करण्याची मागणी केली जात होती. अखेर शासनाकडून १४ मेपासून नावनोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.

नावनोंदणीसाठी काय आवश्यक?
शासकीय खरेदी केंद्रावर माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून पोर्टल सुरु करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, पीकपेरा लावलेला तलाठी सही-शिक्का असलेला मूळ ७/१२ उतारा तसेच सोबत स्वतःचा मोबाईल आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.