जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । ऐन लग्नाच्या मोसमात सोने आणि चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. मात्र या आठवड्यात सुरुवातीला तीन दिवस किमतीत घसरण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी कारण दोन्ही धातूंच्या दरात पुन्हा तुफान वाढ नोंदवली गेली आहे.
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली.दरम्यान, येत्या काही काळात सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असून आगामी अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याची किंमत वाढत असताना चांदीची चकाकी देखील महागली आहे. तर शुक्रवारी सकाळपासूनची सोन्याच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.
शुक्रवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सोन्याच्या दरात 250 रुपयांनी, तर चांदीच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली. सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,633 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,600 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव 81,650 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटीवर सोन्या-चांदीची किंमत
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर, सोने 0.30 टक्क्यांनी म्हणजेच 211 रुपयांच्या वाढीसह 71,425 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव येथे 0.68 टक्क्यांनी म्हणजेच 546 रुपयांनी वाढला असून तो 81,230 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.