जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी परीक्षा देशातील सर्वात कठीण परिक्षेपैकी एक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२३ ला घेण्यात आलेल्या ११४३ जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात जळगाव शहरातील डॉ. नेहा उद्धवसिंह राजपूत ही विद्यार्थिनी पहिल्याच प्रयत्नात एआयआर ५१ या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तसेच एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील प्रीतेश बाविस्कर याने एआयआर ७६७ या क्रमाकांने यश संपादन केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०२३ मध्ये ११४३ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीत रहिवासी असलेली नेहा राजपूतने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. नेहाचे पहिली ते १० पर्यंतचे शिक्षण सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये तर ११, १२ वी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. त्यानंतर जी. एस. मेडिकल कॉलेज परळ, मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयातून तिने एमबीबीएसची पदवी मिळविली आहे.
कमी वेळ, मात्र जिद्द मोठी
एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली होती. परीक्षेसाठी अर्ज केला मात्र एकच वर्ष वेळ मिळाला. ठरावीक व योग्य पुस्तकांतून दिवसाला ७ ते ८ तास अभ्यास करून परीक्षेची तयारी केली.
पहिल्याच प्रयत्नात परीक्षेत यश मिळाले, याचा मोठा आनंद आहे. निकाल जाहीर झाल्यावर आई-वडिलासह संपूर्ण परिवाराला खुप आनंद झाला आहे. त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे मी यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. माझ्या यशाचे खरे श्रेय हे आई-वडिलांचे आहे, असं नेहा म्हणाली.