जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२४ । तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे दीड महिन्यापूर्वी १० हजार रुपये दराने विकली जात असलेल्या तुरीच्या भावात तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात तुरीला १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मंदावलेली आवक आणि आयातीवर असलेल्या मर्यादेमुळे हे भाव वाढले आहे.
मात्र सध्या मोजक्याच शेतकऱ्यांकडे तुरीचा साठा आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. निवडणुकीच्या काळात तुरीच्या भावात मोठी घट होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे तूर खरेदीसाठी व्यापारी, डाळ उद्योजकांनी फारसा रस घेतला नाही. त्यामुळे शेतकरीही चिंतेत होते. आता कापूस, मका यांच्या दरात घसरण होत आहे. अशा स्थितीत तुरीच्या भावात वाढ झाली आहे.
फक्त दीड महिन्यातच तीन हजार रुपयांनी तुरीचे दर वाढले आहे. तुरीचे घटलेले उत्पादन आणि आवक मंदावल्याने तुरीला मागणी वाढली तूर डाळीचे दर १९ हजार रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. त्यामुळे तुरीच्या दरातही तीन हजारांनी वाढ झाली आहे. मात्र, तूर उत्पादक शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांची तूर विक्री झाली आहे. मोजक्याच शेतकऱ्यांकडे तुरीचा साठा शिल्लक आहे. त्यांना याचा फायदा होऊ शकतो.