नशिराबाद येथील गोडावूनवर 58 लाखापेक्षा अधिकचा गुटखा जप्त : सहा जणांवर गुन्हा, दोघे ताब्यात
जळगाव लाईव्ह न्यूज | 29 मार्च 2024 | अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गोडावूनवर 58 लाखाहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केल्याच्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत आज शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतलं आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील काही काळात अवैध गुटख्या वर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलीत. यातच आज नशिराबाद येथे उमाळा रोडवर गट नंबर २० येथील एका गोडावूनमध्ये बेकादेशीररित्या सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू यांची साठवणूक करून विक्रीसाठी आणत असल्याची माहिती जळगाव येथील अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्यासह पथकाने नशिराबाद पोलीसांच्या मदतीने गुरुवार २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता नशिराबाद गावातील गट नंबर २० मधील एका गोडावूनवर छापा टाकला.
या कारवाईत पथकाने एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिथुन कुमार श्याम भूषण सहानी वय २०, अजय कुमार कापुरी सहानी वय-१८ दोन्ही रा. किशन वाडा, ट्रक चालक अब्दुल जहीर खान रा. मध्य प्रदेश, बलवीर सिंग बग्गा रा. इंदोर, मध्य प्रदेश, गोडावून मालक आणि एकावर (पुर्ण नाव माहित नाही) अशा ६ जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मिथुन कुमार सहानी आणि अजयकुमार सहानी या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायतळ हे करीत आहे.