पैशांसाठी आता एटीएम शोधण्याची गरज नाही ; ओटीपीवर मिळेल रोख रक्कम, कसे ते जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२४ । युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI भारतात इतके लोकप्रिय झाले आहे की आजकाल बरेच लोक बाहेर जाताना रोख पैसे सोबत ठेवत नाहीत. तुम्ही ऑनलाइन पैसे देऊन जवळपास सर्व काही खरेदी करू शकता. पण, भारत पूर्णपणे कॅशलेस झाला आहे, असे नाही. ऑनलाइन पेमेंटसोबतच रोख रकमेचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एटीएमचा सर्वाधिक वापर रोख रक्कम काढण्यासाठी केला जातो. पण, येत्या काही दिवसांत तुम्हाला रोख रक्कम काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गरज भासणार नाही. व्हर्च्युअल एटीएमच्या मदतीने तुम्हाला एका ओटीपीवर रोख रक्कम मिळेल. व्हर्च्युअल एटीएम काय आहे, त्याचा वापर कसा करता येईल, कुठे मिळेल ही रक्कम, सर्वकाही जाणून घ्या
पेमार्ट इंडियाने छोट्या रक्कमेबाबत मोठी भूमिका घेतली आहे. चंदीगड येथील या फिनटेक कंपनीने व्हर्च्युअल, कार्डलेस आणि हार्डवेअर-लेस कॅश विदड्रॉल सेवा सुरु केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना आता रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम मशीन शोधण्याच्या भानगडीत पडायचे काम नसेल. तर त्याच्याकडे डेबिट कार्ड नसले तरी रोख रक्कम काढता येणार आहे. रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना पिन क्रमांकाची गरज नसेल. पण त्यांना एक ओटीपीची गरज असेल. पेमार्ट इंडिया प्रायव्हेट कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अमित नारंग या सेवेला व्हर्च्युअल एटीएम असे म्हणतात.
कसा करता येईल व्हर्च्युअल एटीएमचा वापर
व्हर्च्युअल एटीएमच्या मदतीने पैसे काढण्यासाठी तुम्हाला केवळ एक स्मार्टफोन, मोबाईल बँकिंग एप आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. त्यासाठी अगोदर बँकेच्या एपमध्ये रोख रक्कम काढण्यासाठी विनंती करावी लागेल. मोबाईल बँकिंग एपवर तुमचा बँकेत नोंद असलेला मोबाईल क्रमांक त्यासाठी वापरता येईल.
तुम्हाला संबंधित जवळच्या दुकानदाराकडे छोटी रक्कम मागावी लागेल. लक्षात ठेवा ही सुविधा केवळ छोट्या रक्कमेसाठी आहे. मोठ्या रक्कमेसाठी ही सुविधा नसेल. छोट्या रक्कमेला पण काही मर्यादा असेल. संबंधित दुकानदार, टपरीधारकाकडे याविषयीचे यंत्र असेल. त्याआधारे हा व्यवहार पूर्ण होईल.
त्यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक एक ओटीपी क्रमांक पाठवेल. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर हा ओटीपी पाठविण्यात येईल. पेमार्टच्या यादीतील जवळच्या दुकानदाराला हा ओटीपी क्रमांक तुम्हाला दाखवावा लागेल. तो तुम्हाला विनंती केलेली रक्कम रोखीत देईल.