खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । खूनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असलेल्या भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय-४०) या कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दुर्धर आजाराने मृत्यू झाला. ही घटना आज ६ फेब्रुवारी रोजी घडली असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनीमंदीर परीसरातील १८ एप्रिल २०१७ रोजी पत्त्याच्या क्लबमध्ये प्रविण उर्फ नितीन सुरेश माळी या तरूणाच्या डोक्यात दगड टाकून खून झाला होता. या हत्येतील मुख्य संशयित आरोपी म्हणून पंकज वाणी हा जिल्हा कारागृहात बंदीवान कैदी होता. या प्रकरणात संशयित म्हणून पंकज वाणी आणि राहूल सपकाळे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता.
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पंकज वाणी याला दुर्धर आजार झालेला होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती.३ फेब्रुवारी रोजी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला.या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.