प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अवघ्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप ; चित्रपटसृष्टी हळहळली
जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे. तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर देण्यात आली आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
दरम्यान, पूनम पांडे ही सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी राहिली असल्याने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टवर अनेकांना विश्वास बसलेला नाहीये. अपेक्षा आहे की ही पोस्ट खोडसाळपणा नसावा अशी प्रतिक्रिया तिच्या हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
पूनम पांडे हिचा जन्म 11 मार्च 1991 रोजी दिल्लीत झाला होता. तिने पूर्वीपासून मॉडेलिंग क्षेत्रात यायाचं निश्चित केलं होतं. ‘नशा’ चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. यानंतर तिने अन्य दोन चित्रपटांतही काम केले मात्र तीनही चित्रपट सपाटून आपटले होते. पूनमने दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँगही केली होती. तिने दावा केला होता की तिला या गाण्यांसाठी 5 कोटी रुपये मिळायचे, मात्र त्यावर अनेकांनी विश्वास ठेवला नव्हता.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तन, फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर स्त्रियांमध्ये आढळणारा चौथा सर्वात जास्त कर्करोग आहे. जगातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू हिंदुस्थानात होतात. दरवर्षी जगभरात अंदाजे एक लाख 25 हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान होते.