जळगावात जानेवारीत प्रथमच तापमान 10 अंशाच्या खाली, पुढील तीन दिवस राहणार असे?
जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट परसली आहे. यासोबतच दाट धुके आणि अनेक भागांत बर्फवृष्टी होताना दिसत आहे. परिणामी महाराष्ट्रात देखील थंडी वाढली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असणाऱ्या जळगाव शहराचा पारा सर्वाधिक घसरला आहे. जळगाव राज्यातील ‘कोल्ड सिटी’ झाले आहे. सोमवारी राज्यात जळगावचा पारा सर्वात नीचांकी 9.9 अंशांपर्यंत नोंदवण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे चार महिने थंडीचे मानले जातात. त्यातही फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेनंतर तापमानात वाढ होत जाते. त्यामुळे मुख्यत्वे करून नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने थंडीचे मानले जातात. गेल्या अडीच महिन्यांपासून हिवाळा सुरू झाला असला, तरी अद्यापपर्यंत कडाक्याची थंडी जाणवली नाही. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात गेल्यावर्षी दोन ते तीनवेळा थंडीची लाट आली होती. मात्र, यंदा अर्धा महिना संपल्यानंतर पहिल्यांदाच पारा १० अंशाच्या खाली आला असून, सोमवारी जळगाव शहरात ९.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे काहीअंशी गारठा वाढला होता.
तीन दिवस थंडीचे, कोरड्या वातावरणामुळे गारठा वाढणार
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. त्यातच धुक्याचेही प्रमाण होते. त्यामुळे थंडी फारशी जाणवत नव्हती. मात्र, रविवारी रात्रीपासून थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढला असून, शनिवारी १२ अंशावर असलेला पारा सोमवारी ९.९ अंशावर आला होता. दरम्यान, आगामी काही दिवस जिल्ह्यात कोरडे वातावरण राहणार आहे.