⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | वाळूमाफियाची मुजोरी! प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर चढवले

वाळूमाफियाची मुजोरी! प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर चढवले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची दादागिरी वाढलेली दिसून येतेय. कारवाई करूनही अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे दिसून येते. याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून परताना अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवणाऱ्या चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवून धडक दिल्याची घटना घडली.

यात प्रांताधिकाऱ्यांचे वाहनाचे नुकसान होऊन त्यांच्या ते किरकोळ जखमी झाले आहे. तर तलाठी यांनाही ट्रॅक्टर चालकाने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाळू मापियांची मुजोरी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर माहिती अशी, की प्रांताधिकारी भंगाळे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून दुपारी साडेतीन वाजेदरम्यान पत्नी आणि मुलीसह चोपडा येथे परत येत होते. यावेळी खडगाव येथे एक ट्रॅक्टर अवैध पद्धतीने वाळू नेताना त्यांना आढळला. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना ही माहिती सांगितली. यानुसार तलाठी पावरा यांनी त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करीत ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून ‘तू साइडला झाला नाही तर तुला उडवून देईन’ अशी धमकी दिली.

याचदरम्यान प्रांताधिकारी भंगाळे यांनी त्यांच्या कारचा वेग वाढवून या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टरचालक राजेश विकास मालवे (वय २३, रा. खरग, ता. चोपडा) याने प्रांताधिकारी यांच्या कारला धडक दिली.

सदर घटना मंगळवारी दि. १९ दुपारी खडगावजवळ घडली. या धडकेमुळे प्रांताधिकाऱ्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे, तर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत.

दरम्यान, प्रांताधिकारी भंगाळे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्याविरोधात कलम 353, 332, 379, 504, 506, 527 व महसूल अधिनियम कलम 48 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.