जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असं म्हटलं जाते. पण उद्या मंगळवारी ही सावली काही क्षणासाठी आपली साथ सोडणार असून जळगावकरांना हाच क्षण अनुभवता येणार आहे. उद्या मंगळवार, दि. २५ मे रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभव घेता येणार आहे. निसर्गाच्या या अदभूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीरो शॅडो डे’ असे म्हणतात.
काय आहे ‘शून्य सावली दिवस’
पृथ्वी आपल्या २३.५ अंशातून झुकलेल्या अक्षासह सूर्याभोवती फिरते. पण पृथ्वीवरून बघताना आपल्याला सूर्य कधी उत्तर तर कधी दक्षिण दिशेकडे सरकतोय, असा भास होतो. ज्याला आपण उत्तरायण व दक्षिणायन म्हणतो. पृथ्वीवरील आपले भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी आडव्या आणि उभ्या काल्पनिक रेषा असतात. आडव्या रेषांना अक्षांश (Latitude) आणि उभ्या रेषांना रेखांश (Longitude) असे म्हणतात. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रवासाच्या काळात सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर (Latitude) उगवतो ज्याला ‘सूर्याची क्रांती’ (सन डेक्लीनेशन) असे म्हणतात.
२१ मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर म्हणजे शून्य अक्षांशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो. आपण उत्तर गोलार्धात विषुववृत्त आणि कर्कवृत्ताच्यामध्ये २१.०० अंश उत्तर (२१.००° N) या अक्षांशावर आहोत. असे प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. २१ मार्च ते २१ जून या उत्तरायणाच्या काळात २५ मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. थोडक्यात २५ मे रोजी सूर्य २१.०० अक्षांशावर उगवतो त्यादिवशी १२ वाजून २४ मिनिटे ४५ सेकंद या वेळी आपण ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवतो. २१ जूननंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन (सूर्याची क्रांती) परत आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे ‘शून्य सावलीचा क्षण’ आपल्याला अनुभावास मिळतो.
दुपारी १२ वाजेपासून थेट प्रक्षेपण करणार
यंदाही कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य नसल्याने या कार्यक्रमाचे १२ वाजेपासून थेट प्रक्षेपण अमोघ जोशी यांच्या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून करण्यात येणार अाहे. सर्व खगोलप्रेमींनी या भौगोलिक घटनेचा आनंद घ्यावा व त्या मागील विज्ञान समजून घ्यावे असे आवाहन खगोल अभ्यासक जोशी यांनी केले आहे.