जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२३ । दिवाळी संपल्यानंतर आता परतणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेल्वेत गर्दी दिसून येत आहे. यातच प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्याचे पाहून मध्य रेल्वेने नागपूर ते पुणे (Nagpur Pune Express) ही विशेष वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रविवार पासून या गाडीला सुरुवात होत असून या विशेष ट्रेनमधील तिकिटांचे आरक्षण शनिवारी सायंकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू झाले आहे. दरम्यान, ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने जिल्ह्यामधील प्रवाशांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने आता नागपूर पुणे वन वे स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. आज म्हणेजच रविवारी १९ नोव्हेंबरपासून ही गाडी सुरू होणार आहे. ०११६६ क्रमांकाची ही गाडी नागपूर येथून रविवारी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता ती पुण्यात पोहचेल. या गाडीला एकूण २२ कोच असतील. त्यात ११ कोच एसी टू टियर, ९ कोच एसी थ्री टियर आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश राहणार आहे.
या स्थानकांवर थांबणार
नागपूर – पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड चोर मार्ग या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.
दरम्यान, ही गाडी दिवाळीच्या किमान आठ दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सुरू करायला हवी होती. तसे झाले असते तर प्रवाशांना सेवा मिळाली असती आणि रेल्वेला चांगला महसुल मिळाला असता. मात्र, तसे न करता आता दिवाळीचा पाडवा संपल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केली. ही गाडी नेमकी कधी पर्यंत चालविली जाणार आहे, हे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट होऊ शकले नाही.