जळगाव लाईव्ह न्यूज : 13 नोव्हेंबर 2023 : सणासुदीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून आणखी ९ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार असून नागपूर ते सीएसएमटी, सीएसएमटी ते दानापूरदरम्यान या गाड्या धावणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथून मुंबईला येण्यासाठी गुरुवारी रात्री स्पेशल ट्रेन सोडण्यात येईल. ही ट्रेन १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल.
या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईहून दानापूर येथे जाण्यासाठी सीएसएमटी-दानापूर स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे.
ही ट्रेन १८ आणि २५ नोव्हेंबरला सकाळी ११.५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता दानापूरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ही ट्रेन १९ आणि २६ नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाअकरा वाजता सीएसएमटीला येईल.
सीएसएमटी-दानापूर या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे. विशेष गाड्यांसाठी आरक्षणाची सुविधा असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.