जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । सोने-चांदीत (Gold Silver Rate) सध्या चढउताराचे सत्र सुरु आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच जागतिक घडामोडींमुळे आणि युद्धामुळे दोन्ही धातूंचे दर भडकले. गेल्या महिन्यात किंमती चार हजारांनी वधारल्या. मात्र, सोन्याच्या दरात तेजीचे वातावरण असताना अचानक घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच खरेदीदारांसाठी आनंदवार्ता आहे. Gold silver Rate Today
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीत घसरण दिसून आली. त्यांनतर सलग तीन दिवस घसरण झाल्याने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. या तीन दिवसांत सोन्यात 1020 रुपयांची स्वस्ताई आली. 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 230 रुपये, 550 रुपये आणि 320 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या. मात्र त्यांनतर 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. तर 3 नोव्हेंबर रोजी 115 रुपयांची वाढ आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत 887 रुपयाची मोठी वाढ झाली आहे.
यांनतर आता 22 कॅरेट सोने 56,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीचा दर 73000 रुपये इतका आहे.
यापूर्वी सोन्याचे दर ऑगस्ट महिन्यात 57 ते 58 हजार रुपयांच्या दरम्यान होते. त्यात ऑक्टोबर महिन्यात वाढ होत अखेरीस 62 हजारांचा टप्पा गाठला गेला होता. मुळात दिवाळीत सोन्याचे दर 62 हजारांचा टप्पा पार करतील, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला होता.मात्र सोन्याच्या किमतीने हा टप्पा त्याआधीच ओलांडला. त्याला कारणीभूत जागतिक घडामोडींमुळे आणि इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्ध होते.
आता दिवाळीसारखा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत लोकांचे लक्ष सोने आणि चांदीच्या दरांकडे लागून आहे.