जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२३ । सैन्यात दाखल होऊन देशसेवेची स्वप्न अनेक तरुण बाळगत असतात. दरम्यान, कठोर परिश्रम व मेहनत तसेच अभ्यासातील सातत्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील प्रथम उर्फ यश गोरख महाले (22) या तरुणाने पदापर्यंत मजल मारली. मात्र, यश यांचे प्रशिक्षणार्थी लेफ्टनंट कर्नल स्वप्न अधुरेच राहिले.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील एनडीए राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणादरम्यान त्याच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाला होता. दक्षिण कमांड सैनिक हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पिंपळनेर येथील निवासस्थानी गुरुवारी (ता. १९) सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खडकवासला येथील ‘एनडीए’ प्रशिक्षण केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून पुढील महिन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू होणारे येथील प्रथम (यश) महाले (वय २२) यांना प्रशिक्षण केंद्रात बॉक्सिंग गेम्स व इतर उपक्रम करताना मुकामार लागल्याचे समजते. पुणे येथे रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक गोरख महाले व इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका शीतल महाले (शेवाळे) यांचे ते एकुलते पुत्र होत. यश यांनी वयाच्या २२ व्या वर्षी ‘एनडीए’मध्ये लेफ्टनंट कर्नल या पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांची पुढील महिन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर थेट नियुक्ती होणार होती. मात्र, नियतीने अचानकच घाला घातला.
गुरुवारी पहाटे यश यांचे पार्थिव पिंपळनेर येथील महात्मा फुलेनगरातील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. नंतर सायगाव येथे शासकीय इतमामात सकाळी नऊला अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.