एकनाथ खडसेंसह कुटुंबाला मोठ्या दंडाची नोटीस ; नेमकं काय आहे प्रकरण?

ऑक्टोबर 19, 2023 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२३ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अवैध गौण खनिज उत्खन व वाहतूक केल्याप्रकरणी एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

MAL khadse jpg webp

मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. सातोर शिवारात 1 लाख 18 हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली होती.

एसआयटीने या प्रकरणाची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे यांच्यासह सहा जमीनमालकांना मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत.

यामध्ये एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि सून भाजप खासदार रक्षा खडसे यांनाही दंडाची नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या नोटिशीला एकनाथ खडसे अथवा रक्षा खडसे यांनी अद्याप दुजोरा दिला नाही. या प्रकरणी ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now