जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या धर्मनिरपेक्ष सर्वस्तरीय सर्वस्पर्शी सामाजिक कार्याची व पत्रकारीता क्षेत्रातील अजोड संघटनात्मक कार्याची दखल घेत बेंगलोर येथील बिल्लोरी फाउंडेशनच्या वतीने मदर्स डे चे औचित्य साधून मदर टेरेसा अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रतिष्ठित संस्थेचा बहुमूल्य पुरस्कार मिळाल्या प्रित्यर्थ सहकार व राजकीय क्षेत्रातील तसेच पत्रकार बंधू मित्र मंडळांच्या वतीने नुरुद्दीन मुल्लाजींचा जिल्हयात विविध स्तरावर शासकीय नियम पाळून अनौपचारीकपणे हृद्य सत्कार करण्यात आला. वनकोठे येथील मिलिंद पवार, मुशताक शायर अमळनेर येथील पत्रकार मित्र मंडळ तर्फे ईश्वर महाजन, अमळनेर येथील माजी नगरसेवक तथा माळी समाजाचे माजी तालुकाध्यक्ष ॲड.सुरेश सोनवणे,प्राध्यापक नगराज माळी व मित्र मंडळ,अमळनेर येथील डॉक्टर सलीम, ॲड. ए .जी खान,वैद्य शेख नईम, पत्रकार सत्तार खान, कासोदा येथील मुजाहिद खान, हम जे खान जळगाव येथील जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले सर,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव उपक्रमाचे जिल्हा प्रमुख विजय सुपडू लुल्हे सर आदी मान्यवरांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
सत्कारा प्रसंगी विजय लुल्हे म्हणाले की, करुणा सेवा, समर्पणशीलता ही नुरूद्दीन दादांच्या कार्याची यशस्वी त्रिसूत्री आहे.अखंड कार्यशीलतेमध्ये दादांच्या चिरतारुण्याचे रहस्य दडलेले आहे पत्रकार ईश्वर महाजन म्हणाले की, मुल्लाजी मदर टेरेसा यांच्या कार्याचा वसा घेऊन वारसा चालविणारे अल्लाह के बंदे आहेत.” मान्यवरांनी मुल्लांजींच्या अनेकविध प्रेरणादायी उत्तुंग समाजकार्याची माहिती आपल्या मनोगतात दिली.