जळगाव लाईव्ह न्यूज | १८ ऑक्टोबर २०२३ | यंदाचा पावसाळा काहीसा लहरीच राहिला. सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली मात्र जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालाच नाही. याचे परिणाम येणाऱ्या काळात दिसून येणार आहेत. जिल्ह्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस केवळ ८८.८ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणी पातळीत घट झाली आहे.
जिल्ह्यात जूनच्या सुरवातीला काही दिवस पावसाची कृपादृष्टी राहिली. त्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली होती. जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्यातही फार थोडे दिवस पर्जन्यमान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापी पट्ट्यात चांगला पाऊस झाला. सप्टेंबरनंतर वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून जिल्ह्याची पाणीपातळी तपासली जाते. निरीक्षणासाठी काही विहिरी निश्चित करण्यात येतात. यंदाही अशी तपासणी नुकतीच करण्यात आली आहे.
या पाहणीत चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळीत १.५२ मीटरने घट झाली असल्याचे समोर आले आहे. त्या पाठोपाठ जळगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव तालुक्यांमधील पाणीपातळीत घट झाली आहे. दुसरीकडे मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, बोदवड, यावल, एरंडोल, जामनेर या सहा तालुक्यांमध्ये भूजलपातळीत वाढ झाली आहे.
तालुकानिहाय पाणी पातळीत झालेली घट (घट मीटरमध्ये)
चाळीसगाव – १.५२
जळगाव – ०.२६
धरणगाव – ०.७५
चोपडा – ०.२१
अमळनेर – ०.७४
भडगाव – ०.१०