जळगाव लाईव्ह न्यूज | ६ ऑक्टोबर २०२३ | जळगाव विमानतळामुळे जिल्ह्याच्या विकासाला पंख लाभतील अशी स्वप्न पाहिली जात होती. मोठा गाजावाजा करत जळगाव विमानतळ सुरु देखील झाले. मात्र जळगाव विमानतळाचा जळगावकरांना फायदा झालाच नाही! गेल्या अडीच वर्षांपासून जळगाव विमानतळावरील विमानसेवा बंद आहे. मध्यंतरी तर विमानसेवा बंद असल्याने विमानतळ प्राधिकरण जळगावातून गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत २६ डिसेंबर २०१७ ला जळगाव -मुंबई विमान सेवेला सुरवात झाली. तीन महिन्यात आठवड्यातून तीन वेळा विमान फेर्यांची सुविधा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्याच्या आतच ही विमानसेवा बंद झाली. एअर डेक्कन, ट्रु जेट या कंपन्यांची विमाने काही काळ जळगावला आली पण नंतर विमानसेवेआभावी जळगाव विमानतळ शोपीस झाले आहे.
सुमारे सहा वर्षांपूर्वी आरसीएस या योजनेत जळगावातून विमान सेवा सुरु झाली. ती मुंबई, अहमदाबाद व नंतर कोल्हापूरसाठी होती. नव्याने सुरु झालेली विमानसेवा काही काळ चालली आणि बंद झाली. आता गेल्या अडीच वर्षांपासून ही सेवा बंद आहे. आता जळगाव शहराची विमानसेवा पुन्हा सुरु होण्याचे संकेत आहे. नव्याने स्थापित झालेल्या “फ्लाय ११’ ही प्रादेशिक एअरलाइन्स कंपनी ही सुविधा पुरवणार असून डिसेंबर महिन्यापासून जळगावातून ही सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे.
जळगावातून प्रथमच पुणे, हैद्राबाद व गोवा ते तीन शहर विमानसेवेने जोडली जाणार आहेत. शड्यूल काम सुरु विमानसेवेचे वेळापत्रक निश्चित होणे बाकी आहे. तसेच पुणे विमानतळावरून स्लॉट मिळण्याची प्रक्रिया अद्याप पार पडायची आहे. ती झाल्यानंतर जळगावातून तिन्ही शहरांना वेगवेगळ्या वेळी विमाने उड्डाण भरतील की विमानसेवा एकमेकांशी कनेक्ट असतील, याबाबतचे धोरण निश्चित होईल, असे सूत्रांनी सांगितले.