महाराष्ट्रातून पावसाच्या परतीचा प्रवास; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात, सध्याची स्थिती जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२३ । यंदा उशिरा दाखल झालेल्या मान्सून पावसाने जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली होती. मात्र त्यांनतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली होती. परंतु गेल्या महिन्यात पावसाने हजेरी लावत पिकांना जीवदान दिले होते. राज्यात पावसाने अजूनही सरासरी गाठली नाही. मान्सूनचा हंगाम संपला असून आता परतीचा पाऊस देशभरात सुरु झाला आहे. राज्यात कधीपासून पाऊस परतणार? याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
देशातील अनेक भागातून परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास देशात राजस्थानपासून सुरु होता. यंदा राजस्थानमधून परतीचा पाऊस उशिरानेच सुरु झाला. दरवर्षी १७ सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सून परतण्यास सुरुवात होते. यंदा २५ सप्टेंबरपासून मान्सून परतला.
देशातील अनेक भागातून मान्सून परतला असून महाराष्ट्रातून तीन दिवसांत मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून १० ऑक्टोंबरपर्यंत मान्सून परतणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.अनुपम काश्यपी यांनी सांगितले.
राज्यात सध्या काय आहे परिस्थिती
राज्यात सध्या कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. रत्नागिरी- कोकणात आता मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी बाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळे राज्यात मान्सूनचा जोर कमी झाला आहे. येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने पावसाचा कोणताच इशारा दिलेला नाही. तसेच कुठे ऑरेंज अलर्ट दिलेला नाही. राज्यात अजून अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. जळगाव शहरात बुधवारी तापमानाचा पारा ३६ अंशावर गेला होता. तापमानात वाढ झाल्याने असह्य उकाडा जाणवत आहे. आगामी काही दिवसात तापमानाचा पारा ३७ अंशावर जाणार आहे.