जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरण्याची खोळंबल्या होत्या. जूनमध्ये ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. यातही ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसामुळे खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के तुट येणार आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी सुरुवातीला कापसाला चांगला भाव मिळाला. मात्र त्यानंतर कापसाला दर नसल्याने शेतकरी वर्ग संकटात होता. त्यामुळे यंदा कापसाला काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, बागायती कापसासह जिरायतीला सात ते साडेसात हजारांचा दर मिळू शकेल, अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के पाऊस झाल्यामुळे आगामी रब्बी हंगामात चांगले उत्पादन येण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. गेल्या वर्षीच्या खरिप हंगामात (२०२२) कापूस उत्पादन चांगले आले. त्यावेळी कापसाला २०२१ प्रमाणे दहा ते तेरा हजारांचा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापसाची मागणी, दर पाहता कापसाला साडेसात ते आठ हजारांचा दर मिळाला.
या हंगामातील खरिपातील कापूस उत्पादनाचा विचार करता, बागायती कापूस चाळीस टक्के क्षेत्रावर आहे. त्याचा दर्जा चांगला आहे. कोरडवाहू कापूस साठ टक्के क्षेत्रावर आहे. त्याची अद्यापही पावसाअभावी वाढ पूर्ण झालेली नाही. त्याचे उत्पादन नवरात्रोत्सवात येणे अपेक्षीत होते. मात्र ते डिसेंबरमध्ये येईल.
दसरा- दिवाळीत बागायती कापूस बाजारात विक्रीस येईल. त्याला सध्या असलेला सात ते साडेसात हजारांचा दरच मिळेल. कारण अद्यापही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाला मागणी वाढलेली नाही. जर काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला मागणी वाढून खंडीचा दर साठ हजारांपर्यंत गेला, तरच कापसाचे दर वाढतील, असे चित्र आहे.