जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । कांदा उत्पादक शेतकऱ्यांची टेंशन वाढवणारी एक बातमी आहे. कांदा व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून व्यापाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरू झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील सर्व 17 बाजार समिती आणि उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिका-यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.
काही दिवसांपुर्वी केंद्र सरकारने कांद्याचे दर वाढत असतांना निर्यात मुल्यात ४० टक्के वाढ केल्याच्या निर्णयानंतर राज्यासह नाशिक जिल्ह्यात (Nashik) अनेक संघटनांनी बंद पुकारला त्याला अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांनी साथ दिली होती.त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या (NAFED) मार्फत २४२० रुपये कांदा खरेदीची घोषणा केली. बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु होत नाही तोच पुन्हा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बंद पुकारला आहे.
कांदा विक्रीसाठी न आल्याने कांदा उत्पादकांची कोंडी होणार झाली आहे. या बंद दरम्यान दररोज अंदाजे 30 ते 40 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. तर एकीकडे अल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट असताना दुसरीकडे ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याने कांदा महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या आहेत मागण्या?
कांद्याचे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करावे, नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट मध्ये करुन त्याची विक्री रेशनमार्फत करावी, केंद्र व राज्य शासनाला कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारावर सरसकट पाच टक्के सबसिडी व देशातर्गत वाहतूकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी हा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.